गौळणीचा थाट निघाला मथुरे हातालागीं |
तें देखोनि जगदीश धांवला गोप घेऊनी वेगीं ||1||
कान्हयां सरसर परता नको आरुता येऊं |
तुझा संग झालिया मग मी घरा कैसी जाऊं ||धृ||
सासुरवासिनी आम्ही गौळणी जाऊं दे रे हरी |
बहु वेळ लागतां सासु सासरे कोपतील घरीं ||2||
आम्हीं बहुजनी येकला तु शारंगपाणी दिससी येथें |
हृदयमंदिरीं ठेऊनी तुंतें जाऊं मथुरांपथें ||3||
एका जनार्दनी ब्रह्मावादिनी गोपिका बरवटां |
कृष्णापदीं त्या लीन झाल्या पूर्णपणें तन्निष्ठा ||4||