आम्हां भय धाक कोणाचा रे पाहें । काळ मशक काय मानव हे ॥१॥
आम्हांसी ते काय चिंता या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥ध्रु.॥
काय करावी हे कोणाची मान्यता । करितां अनंता कोण वारी ॥२॥
नाहीं शीण आम्हां झालें कवतुक । पुनीत हे लोक करावया ॥३॥
तुका म्हणे खातों आनंदाचे लाडू । नका चरफडूं घ्या रे तुम्ही ॥४॥
![]() |
| आम्हां भय धाक कोणाचा रे पाहें । काळ मशक काय मानव हे |
अर्थ -
आम्ही हरीचे दास आहोत त्यामुळे आम्हाला कोणाचा धाक आणि कोणाचे भय आहे काळ आमच्यापुढे अगदी मक्षकाप्रमाणे आहे तर सामान्य मनुष्यांची आमच्यापुढे काय कथा आहे ? आम्हाला आमच्या पोटाची कसली चिंता आली आमचे पोट भरणारी आमची पांडूरंग माऊली आहे. आम्हाला कोणी मान्यता जरी दिली तरी त्याच्या मान्यतेची आम्हाला काय गरज आहे आणि काय करायची आम्हाला ती मान्यता प्रत्यक्ष अनंताने आम्हाला मान्यता दिली आम्हाला मोठेपणा दिला आहे आणि अनंताने दिलेल्या मोठेपणाला कोण प्रतिबंध करणार आहे ? लोकांना पुनीत म्हणजे पुण्यवान करणे हे आमच्यासाठी कौतुक नाही तर आमच्यासाठी तो शीण झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “अरे मी तर आनंदाचे लाडू खात आहे आणि तो अनंदाचा लाडू तुम्ही देखील घ्या आणि समाधानाने खा उगाच चरफड करु नका.”
