काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसे ॥१॥
थोरीव सांडिली आपुली परिसें । नेणे शिवों कैसें लोखंडासी ॥२॥
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टविती परउपकारें ॥३॥
भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥४॥
तुका म्हणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें स्त्रवतसे ॥५॥