एकादशी अभंग,एकादशी अन्न पान

एकादशीस अन्न पान | जे नर करिती भोजन | श्वानविष्ठे समान | अधम जन तो एक ||१||

ऐका व्रताचें महिमान| नेमें आचरती जन | गाती ऐकतीं हरिकीर्तन | ते समान विष्णूशीं ||धृ ||

अशुद्ध विटाळसीचें खळ | विडा भिक्षतां तांबूल | सांपडे सबळ |काळाहातीं न सुटे ||२||

सेज बाज विलास भोग | करी कामिनीशीं संग | तया जोडे क्षयरोग | जन्मव्याधी बळिवंत ||३||

आपण न वजे हरिकीर्तना |अणिकां वारी जातां कोणा | त्याच्या पापें जाणा | ठेंगणा महा मेरु ||४||

तया दंडी यमदूत | जाले तयाचे अंकित | तुका म्हणे व्रत | एकादशी चुकलीया ||५||

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या